होळी (नंतरची) पहाट…

डॉक्टरांच्या जबरदस्तीमुळे सकाळी फिरायला निघालो
नेहमीप्रमाणे (?)
प्रश्न चिन्ह माझे नाही, बायकोच्या चेहऱ्यावरून काढून लावलय
ज्याचे श्रेय त्याला दिलेले बरे, उगीच कॉपीराईटचा भंग नको

असो, डॉक्टरांच्या जबरदस्तीमुळे सकाळी फिरायला निघालो
काल होळी, जागोजागी राखेचे ढीग दिसत होते
त्या ढीगांवर कुत्री मस्त उब घेत वेटोळ करून झोपली होती
काही फ्रेश होऊन कळपाकळपाने टेहाळणी च्या कामाला लागली होती
काही टक लावून कारच्या छत्रछायेखालून बघत होती
काही भर रस्त्यावर योगासने करीत होती


एक पूर्ण अंध कुत्र आवाज आणि वासाचा अंदाज घेत फूटपाथवर उभे होते
त्याला बरेच दिवस त्याच भागात बघतो
देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचे जिवंत उदाहरण
प्राणीप्रेमी मुलीमुळे हल्ली भटकी कुत्री जास्तच नजरेत भरायला लागली आहेत
असो…

टॅक्सीवाले पॅंटच्या खिशात दोन्ही हात घालून एक पाय दुमडून
टॅक्सीला टेकून गिऱ्हाईकाची वाट बघत उभे होते
कावळे भीरभीरत होते, उकिरड्यावरून ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्यावरून
कबूतरे, उपजत धाडसाने, अजून रिकाम्या असलेल्या रस्त्याच्या मध्ये येऊन
किराणामालाच्या दुकानासमोरचे सांडलेले धान्य टिपत होती

बसस्टॉपवर एक नवीन भरती झालेली, प्लॅसटीकची काठी हाती घेतलेली, पोलीस तरुणी
कानातल्या मोबाईलमध्ये सांगत होती, “तुमचा फोन यायच्या आधीच मी उठले होते”

मटणाच्या दुकानात तीन बकऱ्यांचे सांगाडे उलटे लटकावलेले होते
एक अर्धा गायब होता, तरी म्हणावी तशी गर्दी अजून उसळली नव्हती
थोड्या वेळाने उसळणार याची खात्री मात्र होती
खाटीक मात्र फूल तयारीनीशी बसला होता…

मैदानात पोहोचलो, फाटकापाशी काही लोक
ज्यूस सेंटर वर कारले, गहू, आवळा, अलुव्हेरा वगैरे पीत होती
काही अवंढा गिळल्यासारखे तोंड वाकडे करून
तर काही स्वस्त आरोग्याची मस्त गुरुकिल्ली गवसल्याच्या उन्मादात
मैदानात माणसे वॉकींग ट्रॅकवर घिरट्या घालत होती
राजकीय नेत्यांचे फोटो आणि पक्षांची चिन्हे असलेले टी शर्ट घातलेली बरीच मंडळी दिसली

वाटले पहाटे पहाटे मोर्चा आला की काय
दिवळी पहाट तशी होळी (नंतरची) पहाट साजरी करायला
पण सगळ्या पक्षाचे लोक एकत्र कसे याचे गुढ उकलेना
आणि थोड्या वेळाने डोक्यात प्रकाश पडला, आज धुळवड…
भारतीय जनता की जय हो!!!

शुभराज बुवा
१० मार्च २०२०
धुळवड

Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.

Loading

Similar Posts