|

दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्राच्या कार्यासंबंधीचे माझे अनुभव – पोलीस निरीक्षक धनश्री करमरकर

दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्राच्या कार्यासंबंधीचे माझे अनुभवपोलीस निरीक्षक – धनश्री करमरकर.महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालनालयातील पोलीस निरीक्षक धनश्री करमरकर (MCom, LLB) यांनी काल दिनांक १० डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७:३० ते ९:१५ या कालावधीत विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रश्नोत्तरांसह “दक्षिण सुदानमधील माझे अनुभव” या विषयावर डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालयात व्याख्यान दिले.

२००८ साली मुंबई पोलीसांमध्ये कार्यरत असताना करमरकर मॅडमना सुदान मधील संयुक्त राष्ट्र शांतीसेनेमध्ये जाण्याची संधी मिळाली. अर्थात स्वेच्छेने त्यांनी ती मिळवली. त्यासाठीची परिक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. यामध्ये लेखी परिक्षा, मुलाखत, वाहन चालवण्याची परिक्षा, आणि फायर आर्म्स (पिस्तुल आणि विविध तऱ्हेच्या बंदुका) चालवण्याची परिक्षा अशा विविध परिक्षांचा समावेश होतो. परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना सुदानमधील संयुक्त राष्ट्र शांतीसेनेमध्ये जाण्याची संधी मिळाली.

पहिल्या वेळेस एक वर्ष त्या सुदान मध्ये होत्या. २०१० मध्ये दुसऱ्या वेळेस त्यांना सुदानला जाण्याची संधी मिळाली. या वेळेस २०१० ते २०१६ या कालावधीत संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (United Nations Development Programme – UNDP) प्रतिनिधी म्हणून त्या तिथे राहील्या. त्या काळात त्यांच्यावर तेथिल तुरुंग, न्यायव्यवस्था, पारंपारिक न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन या सर्व संस्थांची आणि व्यवस्थांची स्थापना करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याकाळात आलेल्या भयंकर आणि धक्कादायक अनुभवांची मांडणी त्यांनी आपल्या थेट ह्रदयाला भिडणाऱ्या सहज सोप्या शैलीत दिलेल्या व्याख्यानात केली. या व्याख्यानातून संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना किती गरजेची आहे, तिच्या कार्यामुळे किती जीव वाचले असतील, किती खडतर परिस्थिती मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी काम करावे लागते आणि सुदानमधील जनजीवन आणि तेथिल संस्कृती याविषयी बरीच धक्कादायक माहिती मिळाली.

वास्तव कल्पनेच्या बरेच पलिकडे असते याचा पुन्हा अनोखा अनुभव आला. त्यांच्या व्याख्यानाचा सारांश काही अधिक संदर्भ देऊन खाली मांडला आहे. सुदान हा पूर्व आफ्रिकेमधील तेलसंपन्न परंतु सततच्या यादवी युद्धामुळे आणि दुष्काळ आणि आवर्षणामुळे राजकीय आर्थिक संकटांनी घेरलेला आणि त्यामुळेच मागास राहीलेला देश. उत्तरेकडे इजिप्त, वायव्येकडे लिबिया, पश्चिमेकडे चाड आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लीक, नैऋत्येकडे डेमॉक्रेटीक रिपब्लीक ऑफ काँगो, दक्षिणेकडे युगांडा, अग्नेयेकडे केनिया आणि पूर्वेकडे इथिओपिया आणि एरिट्रिया अशा त्याच्यासारख्याच समस्यांनी घेरलेले देश हे त्याचे शेजारी देश. सुदानमध्ये १९५५ ते १९७२ आणि १९८३ ते २००५ अशी दोन यादवी युद्धे झाली आहेत. सुदान पिपल्स लिबरेशन आर्मी हा दक्षिण सुदान मधील बंडखोरांचा लढवय्या गट. त्यांच्या नेतृत्वाखाली सुदान सरकार विरुद्ध ही दोन्ही युद्धे लढली गेली. सुदान पिपल्स लिबरेशन मुव्हमेंट (Sudan People’s Liberation Movement – SPLM) हे या आर्मीचे राजकीय अंग. हे सर्व सुदानच्या दक्षिण भागातील लोक. स्वतंत्र दक्षिण सुदान स्थापन करणे ही त्यांची प्रमुख मागणी होती. १९७२ मध्ये आदिस आबाबा येथे शांतता करार झाला. पण त्याचा परिणाम अल्पकाळ टिकला. १९८३ मध्ये पुन्हा यादवीला सुरवात झाली. २००२ मध्ये केनियामधील माचाकोस येथे झालेल्या करारामध्ये शांततेच्या दृष्टीने बरेच निर्णय घेण्यात आले. २००५ साली संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने सुदान सरकार आणि SPLM यांच्यामध्ये एक सर्वंकश शांतता करार (Comprehensive Peace Agreement) करण्यात आला. त्यांनंतर एक सार्वमत घेण्यात आले.

दक्षिण सुदानमधील जवळपास ९९ टक्के लोकांनी वेगळ्या दक्षिण सुदानच्या बाजूने मतदान केले. जुलै २०११ मध्ये दक्षिण सुदान हे नवे राष्ट्र जन्माला आले. आजच्या जगातील हे सर्वात नवीन राष्ट्र.पूर्वेला इथिओपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला डी. आर. काँगो, पश्चिमेला सेंट्रल आफ्रिकन रिपब्लीक, आणि उत्तरेला सुदान हे दक्षिण सुदानचे शेजारी देश. महाराष्ट्राच्या दुप्पट आकारमान आणि साधारण १ कोटी लोकसंख्या. यामध्ये ६० % ख्रिश्चन, २० % मुसलमान, २० % आफ्रिकन पारंपारिक धर्म मानणारे लोक. धर्मापेक्षा येथेही जमातीला महत्त्व अधिक. ६० हून अधिक जमाती आणि अनेक बोली भाषा. दोन बहुसंख्य जमातींमधील संघर्ष हा दक्षिण सुदानच्या जन्मापासूनचा इतिहास राहीलेला आहे. मागसलेपणा आणि दारिद्र्य प्रचंड आहे. शिक्षणाचा अभाव. संपूर्ण दक्षिण सुदानमध्ये मिळून दोन विद्यापीठे आहेत. पोलीस दल म्हणजे काय असते हे इथल्या लोकांना माहीतच नाही. संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करून पोलीस दलाची स्थापना केली. या दलातील बहुसंख्य पोलीस अशिक्षित आहेत. बहुतेक सर्व रस्ते मातीचे. डांबरी किंवा पक्की सडक अभावानेच. नवे रस्ते बांधून रस्त्यांना नावे देण्यापासून सर्व गोष्टी संयुक्त राष्ट्राच्या विविध संघटनांनी केल्या.

दक्षिण सुदान मध्ये आंब्याची झाडे भरपूर. पोलीस स्टेशन, मतदान केंद्रे, शाळा, काही सरकारी कार्यालये सर्व आंब्याच्या झाडाखाली. काही आणिबाणीची परिस्थिती आली आणि मदतीसाठी कुणाचा फोन आला तर आपण कुठे आहात असे विचारल्यावर त्यांचे उत्तर असे “आंब्याच्या झाडाखाली”. रसत्यांना नावे देण्याचे कामही संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांनीच केले. रस्त्यांना नावे देताना कुठल्याही माणसाचे नाव न देता १,२,३ आणि अ, ब, क अशी नावे देण्यात आली. परत वादाचा प्रश्नच नको. सार्वमत घेतले तेव्हा मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. शेवटी मतपेट्या टोळी प्रमुखाच्या घरी ठेवण्याचा निर्णय झाला. टोळी प्रमुखांनीही संयुक्त राष्ट्रांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. सुदैवाने कोणत्याही टोळीचा दृष्टीकोन संयुक्त राष्ट्रांच्या विरोधी नव्हता. संयुक्त राष्ट्र कार्यकर्त्यांवर कधी हल्ला झाला नाही. संयुक्त राष्ट्र संघटनांनीही कोणत्याही प्रकल्पामध्ये किंवा चर्चेत सर्व गटांचे समान प्रतिनिधीत्व असेल हे नेहमीच कटाक्षाने पाहिले. प्रत्येकाला बोलण्याची आणि आपली बाजू मांडण्याची चर्चा करण्याची भरपूर संधी दिली. शौचालये नाही. त्यामुळे स्त्रीया पहाटे किंवा रात्रीच्या अंधारात प्रातर्विधीसाठी जवळच्या जंगलात जात. ती वेळ साधून त्यांच्यावर अत्याचार होत होते. यावर उपाय म्हणजे प्रत्येकीला शिट्टी देण्यात आली. काही धोका जाणवल्यास शिट्टी वाजवायची. म्हणजे आजुबाजूचे मदतीला धाऊन जायचे. जमात, धर्म याचा फरक न करता लोक मदतील जात असत – ही योजना यशस्वी झाली.रसत्यावर सिग्नल यंत्रणा उभी करताना करमरकर मॅडम इंग्लिशमध्ये बोलणार, खांब उभे करणारे अरेबिक, इंजिनियर चीनी किंव जपानी. सर्वांच्या मध्ये एखादा दुभाषी कधी मिळायचा कधी नाही. पण काम कधी अडले नाही. भावना समजून सर्व काम करायचे.

दक्षिण सुदान हा तेलसंपन्न देश. सुदानच्या फाळणीनंतर ८० % तेलाचे साठे दक्षिण सुदानमध्ये आले. तेल विहीरींची मालकी काही मोजक्या लोकांकडे आहे. ते आपल्या समर्थकांना शस्त्रास्त्रे पुरवतात. AK-47 जवळपास प्रत्येकाच्या घरी सापडते. बंदुकीचा वापरही लोक ‘मोकळेपणाने’ करतात. लहान मुले सहज बंदुका वापरतात. संघर्षात मरणारांची संख्या हजारांमध्येच असते. तितकेच बेघर होतात आणि तितक्याच स्त्रियांवर अत्याचार होतात. शेती आणि गुरे राखणे हे इथले मुख्य व्यवसाय. शेतकरी आणि गुराखी जमातींमध्ये पारंपारिक संघर्ष. गुरांनी शेती उध्वस्त करायची, शेतकऱ्यांनी गुराख्यांवर हल्ले करायचे, गुराख्यांचा प्रतिहल्ला हे न संपणारे दुष्टचक्र. रेडिओचा काही प्रमाणात प्रसार झाला आहे. दूरचित्रवाणी आणि इंटरनेट फार थोड्या लोकांनी अनुभवले आहे. एकूणच बाहेरच्या जगाशी यांचा संबंध कमी. संयुक्त राष्ट्र संघटनांनी घडी बसवून द्यायची, काही दिवस सर्व सुरळीत चालायचे. नंतर काही कारणाने काही कुरबुरींना सुरवात आणि नंतर प्रचंड संघर्ष – दोन गटात हिंसाचार, सर्व व्यवस्था उध्वस्त असा अनुभव करमरकर मॅडम आणि त्यांच्या टीमला अनेकदा आला. हे लोक जर असे वागत असतील, आपल्या कामाची त्यांना किंमत नसेल तर पुन्हा पुन्हा यांच्यासाठी काम करत रहायचे का असेही त्यांना अनेकदा वाटले. एवढे असले तरी positive attitude ठेवून काम करत राहीले पाहिजे असे त्यांचे ठाम मत. भगवद् गीतेचे तत्त्वज्ञान हा त्यांच्या कामाचा आणि विचार करण्याच्या पद्धतीचा आधार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये काम करणाऱ्या एका इथिओपिअन अधिकाऱ्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना करमरकर मॅडमनी गीते बद्दल भाषांतर करून सांगितले. त्यांना ते पटले. आज त्यांचा गीतेचा स्वतंत्र अभ्यास आहे.

-शब्दांकन शुभराज बुवा.0:03 / 1:31

Loading

Similar Posts