Mon, 07/08/2013 - 11:08 — Shubharaj Buwa
शेषराव मोरे हे वतनदार पाटलाच्या पण एका खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले. मॅट्रिकपर्यंत त्यांनी शेतीकाम केलेच,
पण पुढे शेती विकून टाकीपर्यंत (1990) शेतात काम करण्याचा छंद सोडला नाही. सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक होण्याची
त्यांची इच्छा, पण इतरांमुळे नाइलाजाने त्यांना अभियांत्रिकीचे पदवीधर व प्राध्यापक व्हावे लागले.
पण आपला मूळ पिंड त्यांनी सोडला नाही. अभियांत्रिकीच्या अध्यापन काळात दिवसाकाठी सरासरी 7-8 तासांपेक्षा अधिक वेळ सामाजिक शास्त्रांच्या
अभ्यासासाठी देणे शक्य होत नसल्यामुळे वीस वर्ष पूर्ण होताच स्वेच्छा सेवामुक्ती घेऊन (1994) त्यांनी या अभ्यासाला पूर्णतः
वाहून घेतले.
तीव्र बुद्धिमत्ता, बुद्धिवादी जीवनदृष्टी, तर्कशुद्ध विचार, अभियांत्रिकी आणि कायद्याच्या अभ्यासामुळे आलेला काटेकोरपणा,
वास्तवाचे भान, स्वतंत्र विचार करण्याची पद्धत, अभ्यासांती पूर्वीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी, जे पटले ते स्पष्टपणे मांडण्याचा
निर्भीडपणा, आणि हे सारे करण्यामागे समाज व राष्ट्रहिताची तळमळ ही वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून व लेखनातून दिसून येतात.
त्यांची खालील ग्रंथसंपदा याची साक्ष देणारी आहे.
1. सावरकरांच्या बुद्धिवादः एक चिकित्सक अभ्यास (1988, 92) (संक्षिप्त आवृत्ती)
सावरकरांचा बुद्धिवाद व हिंदुत्ववाद (2003, 06)
2. सावरकरांचे समाजकारणः सत्य आणि विपर्यास (1992) (संक्षिप्त आवृत्ती) सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (2003)
3. काश्मीरः एक शापित नंदनवन (1995, 2001, 04)
4. डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरणः एक अभ्यास (1998)
5. विचारकलह (भाग पहिला) (1998)
6. अप्रिय पण... (भाग पहिला) (2001)
http://www.bookganga.com/eBooks/Book/4871229789918335149.htm?Book=Apriya...
अप्रिय (पण सत्य व हितकारक) लिहिण्याचे शेषराव मोरे यांनी जणू व्रतच घेतले आहे. तीन वर्ष दर शुक्रवारी `सामना’ दैनिकात
त्यांनी लिहिलेल्या लोकप्रिय सदराचे नावच होतेः `अप्रिय पण...’. त्यातीलच काही लेखांचा हा संग्रह.
ज्यांची बांधिलकी सत्याशी असते ते कोणत्याच विशिष्ट विचारसरणीशी बांधील नसतात. म्हणून प्रचलित
एखाद्या (प्रतिगामी, पुरोगामी, समाजवादी, हिंदुत्ववादी इ.) विचारसरणीच्या चौकटीत त्यांना बसविण्याचा अनाठायी प्रयत्न कोणी करू नये.
हे लेख वाचून लेखक कोणत्या विचारसरणीचा आहे याचा तर्क करीत बसू नये.
म्हणूनच ते एकीकडे `शंकराचार्यांनी हिंदूंसाठी काय केले?’ म्हणून त्यांना टीकेचे लक्ष्य बनवितात; यज्ञधर्मावर कठोर प्रहार करतात;
संतपीठाच्या योजनेसंबंधात प्रश्र्न उपस्थित करतात. तर दुसरीकडे औरंगजेबाला `सेक्युलर’ व शिवाजीला `जातीय’ म्हणणार्या
असगर अली इंजिनियरचे अंतरंग उघड करतात. एकीकडे `स्वदेशी’वर लिहिताना त्याच्या मुळाशी चातुर्वर्ण्याचे तत्त्व कसे आहे हे
ते दाखवून देऊन हिंदुत्वनिष्ठांना दुखवितात, तर दुसरीकडे डॉ. झकेरियांचा अखंड भारताचा पुरस्कार कसा घातक आहे, तसेच
मौलवींना राजकारणात आणण्यात अग्रमान मौ. आझादांकडे कसा जातो हेही ते दाखवून देतात.
प्रथमदर्शनी जे दिसते, रूढ आहे व जनमानसाला भावते त्यापेक्षा त्या गोष्टीचे अंतरंग कसे वेगळे आहे हे अप्रिय कथन करणे हा त्यांचा लेखनपिंडच आहे.
कोणतेही भाष्य न करता वा स्वतःचे निष्कर्ष न मांडता वाचकांच्या विचारार्थ एखादी गोष्ट जशी आहे तशी स्पष्ट करून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे
एक वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने या संग्रहातील `साने गुरुजींचा ग्रंथः इस्लामी संस्कृती’, `सर्वोच्च न्यायालयाचा हिंदुधर्मगौरव’, `मुस्लिम
स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करा’ वा `बौद्ध व वैदिक धर्मीयांना दावत’ या लेखांचा उल्लेख करता येईल.
`अप्रिय’ असले तरी यातील वस्तुनिष्ठ व मूलगामी चिंतन असणारे अभ्यासपूर्ण लेख वाचकांना हितकारक व विचारप्रवर्तक वाटतील यात शंका नाही.
7. शासनपुरस्कृत मनुवादीः पांडुरंगशास्त्री आठवले (2001, 05)
8. मुस्लिम मनाचा शोध (2000, 1, 3)
9. Islam : Maker of the Muslim Mind (2004)
10. प्रेषितांनंतरचे चार आदर्श खलिफा (2006)
11. 1857 चा जिहाद (2007)
12. अप्रिय पण... (भाग दुसरा) (2008) आगामीः 57 जिहाद ते 47ची फाळणी. अभिनव निर्माण प्रतिष्ठान
Source: http://www.bookganga.com/eBooks/Author/5006408657191799124.htm